कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नीच्या प्रचारासाठी ‘फोनाफोनी’; पुणे पोलिसांची करडी नजर राहणार

पुणे:सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून गुंडांना आणि गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे.पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पत्नीच्या प्रचारासाठी त्याने अनेक मतदारांना फोन लावले असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गजा मारणे याची पत्नी जयश्री कोथरूड भागातून निवडणूक लढवित आहेत. कोथरूड परिसरातील अनेक मतदारांना गजा मारणे याचा फोन आला असून पत्नीला मदत करण्याचे आवाहन तो करत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकारानंतर आता पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता पुणे पोलिसांनी गजा मारणे याचे हात गुंडाळले आहेत.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई झालेल्या गजा मारणे याला अलीकडेच कोर्टाने सशक्त जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन देताना काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहे.त्यानुसार तो निवडणुकीदरम्यान त्याला शहरात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे तो शहराच्या हद्दी बाहेरूनच फोनाफोनी करत असल्याचा स्पष्ट झाल आहे.मारणेला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पाऊलं उचलली आहेत.

मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मारणे बाहेर आल्यानंतर त्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. सध्या तडीपार असताना ही मारणेनं फोन वरून निवडणुकीत प्रभाव पाडायचा प्रयत्न केल्याने पुणे पोलिसांच एक पथक मारणेच्या मागावर आहे.