नितेश राणे यांना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निकाल

मुंबई : नितेश राणे यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. चिखलफेक प्रकरणात शांततेचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ही शिक्षा कणकवली येथील न्यायालयाने सुनावली असून, या निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका रस्त्याच्या पाहणीदरम्यान राणे यांनी अभियंता प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याचा आरोप होता. तसेच त्यांना बांधून ठेवणे आणि असभ्य वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही त्या वेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या प्रकरणी राणे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी काही आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, भारतीय दंडविधान कलम ५०४ (शांततेचा भंग) अंतर्गत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.

दरम्यान, या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राणे यांच्या वकिलांनी घेतल्याची माहिती आहे. पुढील कायदेशीर घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.