Nikhil Wagle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते विधान आलं अंगलट, पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल…

Nikhil Wagle : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी भाजपचे नेते सुनिल देवधर (वय. ५८, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते. त्यावर ट्विट करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली.
तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. Nikhil Wagle
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील कारवाई करतील, अशी आशा आहे. चिथावळीखोर वागळे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी सुनिल देवधर यांनी केली आहे.
दरम्यान, वागळे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पुणे पोलिसांत तक्रार केली आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे. माझ्या वक्तव्याविषयी मी ठाम आहे. मला अटक झाली तरी ‘निर्भय बनो’ आंदोलनाविषयी शुक्रवारी ९ फेब्रुवारीला सभा होणारच.