केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर दावा; सिया गोयलला होत्या ‘या’ वाईट सवयी

पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी न्यायालयीन कोठडीत असतानाच, आता केतनच्या कुटुंबाने गोयल कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. सियाच्या शिक्षणापासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक बाबी लग्न ठरवताना लपवण्यात आल्याचा दावा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.
सियाच्या शिक्षणाबाबत फसवणूक झाल्याचा आरोप

विशाल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, नाते ठरताना सिया गोयल ही बी.कॉम पदवीधर असून स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सिया केवळ दहावी उत्तीर्ण असून बारावीचे शिक्षणही पूर्ण झालेले नाही. ही महत्त्वाची बाब जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘वाईट सवयींमुळे घाईत लग्न लावलं’
विशाल अग्रवाल यांनी आणखी गंभीर दावा करत सियाला दारूसह काही वाईट सवयी असल्याचे सांगितले. तिच्या वागणुकीमुळे कुटुंब त्रस्त होते आणि तिच्या सवयी बदलाव्यात म्हणून एका चांगल्या कुटुंबात लग्न लावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. मात्र, या दाव्यांना पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

घटनास्थळी पुन्हा नेऊन तपास
तपासाचा भाग म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना पुन्हा लोहगड किल्ल्यावर नेले. घटनास्थळी दोघांची स्वतंत्र आणि समोरासमोर चौकशी करण्यात आली. तसेच गुन्ह्यापूर्वी आणि गुन्ह्यानंतर आरोपींनी कोणत्या मार्गाचा वापर केला, याची प्रत्यक्ष पाहणी करून तपास करण्यात आला.

सियाच्या आई-वडिलांचीही होणार चौकशी
पोलिसांनी आतापर्यंत तांत्रिक आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, पुढील टप्प्यात सिया गोयलच्या आई-वडिलांची अधिकृत जबानी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असून, राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.