ड्रग्ज पेडरला पकडण्यासाठी पोलिसांनी टाकला सापळा; १५ हजारांत एमडी खरेदी करायला आलेला व्यक्ती निघाला चक्क पोलीस कॉन्स्टेबल, आधीही निलंबनाची कारवाई झाल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला, मात्र या कारवाईत पोलिसांनाच धक्का देणारी घटना घडली. ड्रग्ज विक्रेत्याला पकडण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या बनावट ग्राहकासोबत व्यवहार करणारा व्यक्ती चक्क मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल निघाला. मालवणी पोलिसांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किरण इंदुलकर याला एमडी खरेदी करताना अटक केली आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, खाकी वर्दीतील कर्मचाऱ्याच्या अमली पदार्थांच्या व्यवहारातील कथित सहभागामुळे पोलिसांच्या अंतर्गत देखरेखीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील गेट क्रमांक ८ जवळ अमली पदार्थांचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नियोजन करून एका व्यक्तीला अमली पदार्थ विक्रेता असल्याचे भासवत सापळा रचला. याच वेळी किरण इंदुलकर तेथे पोहोचला आणि त्याने पैशांचा व्यवहार करून एमडी खरेदी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने सुमारे १५ हजार रुपये देऊन चार ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन खरेदी केले. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला ताब्यात घेतलेली व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पथकाला नव्हती. चौकशीत त्याची ओळख उघड झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

किरण इंदुलकर सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नियुक्ती मालवणी पोलीस ठाण्यात होती. त्यामुळे मालवणी परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवहारांची त्याला माहिती होती का, तसेच या भागातील ड्रग्ज विक्रेत्यांशी त्याचे काही संबंध होते का, याचा तपास आता केला जात आहे. तो अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आधीपासून होता. याच कारणामुळे तो तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचेही सांगितले जात आहे.


विशेष म्हणजे, इंदुलकर याच्याविरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला ताकीद देऊन त्याची बदली करण्यात आली होती. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वीच्या तक्रारी, त्यावेळी झालेली कारवाई आणि सध्याच्या ड्रग्ज प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
इंदुलकर हा बीड जिल्ह्यातील नायगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवणी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ड्रग्ज त्याच्यापर्यंत कुठून पोहोचले, त्याच्या मागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी आहे का, तसेच तो केवळ ग्राहक म्हणून या व्यवहारात सहभागी झाला होता की त्याची भूमिका अधिक मोठी होती, याचा तपास केला जात आहे.
या घटनेमुळे मुंबईतील अमली पदार्थांच्या नेटवर्कवर कारवाई करणाऱ्या पोलिसांसमोरच नवे आव्हान उभे राहिले आहे. ड्रग्ज पेडरला पकडण्यासाठी रचलेल्या सापळ्यातच पोलीस कॉन्स्टेबल अडकल्याने ‘खाकीच्या आड ड्रग्जचं नेटवर्क तर नाही ना?’ या प्रश्नाचीही चर्चा सुरू झाली आहे.