शेवटच्या दिवशीच ‘ट्राय आफ्टर समटाईम’चा फटका! पुणे पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणी ठप्प, हजारो इच्छुकांचा खोळंबा

पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची मुदत संपत असतानाच संकेतस्थळाने साथ सोडल्याने इच्छुक मतदारांची चांगलीच धावपळ उडाली. शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी नव्या मतदार नोंदणीसाठीच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे दिवसभर प्रयत्न करूनही अनेकांना नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याची तक्रार विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली. विशेष म्हणजे, नोंदणीच्या शेवटच्या दिवशीच ही समस्या उद्भवल्याने आता वंचित राहिलेल्या इच्छुकांचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र पदवीधर आणि शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. अधिकृत पोर्टलवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, २६ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच अनेक इच्छुकांना संकेतस्थळावर प्रवेश करताना अडचणी आल्या. नोंदणीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक टाकल्यानंतर येणारा एकवेळ संकेतांक स्वीकारला जात नव्हता. पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय पुढील नोंदणी प्रक्रिया सुरू होत नसल्याने इच्छुकांचा खोळंबा झाला. काही जणांनी वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळावर ‘थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा’ असा संदेश येत असल्याचे सांगितले.


विसर्जन मिरवणुकीनंतर शेवटच्या दिवशी नोंदणीची लगबग
२५ सप्टेंबर रोजी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असल्याने अनेक इच्छुकांना मतदार नोंदणीसाठी वेळ देता आला नव्हता. त्यामुळे शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, ऐनवेळी संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नोंदणी रखडली.
पदवीधर मतदारसंघासाठी पात्र नागरिकांना नमुना १८, तर शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांना नमुना १९ भरून अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. शिक्षक मतदारांसाठी संबंधित संस्थेच्या प्रमुखांचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे.
पुणे विभागात किती मतदार?
जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यामुळे नव्याने मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने पात्र नागरिकांनी अर्ज करण्याची तयारी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना, ६ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, ७ ऑक्टोबरला छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
आता प्रशासन काय निर्णय घेणार?
मतदार नोंदणीची अंतिम मुदत असतानाच संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने दिवसभर प्रयत्न करूनही नोंदणी न करू शकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, अधिकृत संकेतस्थळावर सध्या नोंदणीची सुविधा आणि अंतिम मुदतीसंदर्भात सूचना उपलब्ध आहेत.
त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या पात्र पदवीधर आणि शिक्षकांसाठी मुदतवाढ दिली जाणार का किंवा पर्यायी व्यवस्था केली जाणार का, याबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.