ऑपरेशन टायगरनंतर शिंदे गटाचा नवा डाव? संजय शिरसाट म्हणाले, ‘लवकरच मोठ्या घडामोडी दिसतील’

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता पुढची राजकीय खेळी कोणती, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्याने चर्चांना नवे वळण मिळाले आहे. “लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील,” असे शिरसाट यांनी म्हटल्याने आता ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांवर शिंदे गटाची नजर आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
वरळी येथील वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. “मागच्या गोष्टी काढून उपयोग नाही. काढायला बसलो तर उबाठाची सत्ता घालवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील लोक होते, हे समोर येईल,” असे ते म्हणाले. त्यानंतर लगेचच त्यांनी “लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील,” असा इशारा दिला.

शिरसाटांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची पुढची आवृत्ती येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वीही शिंदे गटाकडून ठाकरे गटातील अनेक नेते संपर्कात असल्याचे दावे करण्यात आले आहेत. जूनमध्येही शिरसाट यांनी आमदार आणि नगरसेवक स्वतःहून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता त्यांचे ताजे विधान केवळ राजकीय टोला आहे की त्यामागे प्रत्यक्ष हालचाली सुरू आहेत, याची उत्सुकता वाढली आहे.


दरम्यान, शिरसाट यांनी वरळी वसतिगृहातील परिस्थितीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना कच्ची फळे दिली जात असल्याच्या आणि जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याचे त्यांनी सांगितले. वसतिगृहाची स्वच्छता आपण पाहणीसाठी येणार असल्याने करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. “विद्यार्थ्यांवर आम्ही उपकार करत नाही, ही आमची बांधिलकी आहे,” असे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिल्याचे स्पष्ट केले.
वसतिगृहात काही जण अनधिकृतपणे राहत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. काही जण विद्यार्थी असल्याचे दाखवत नोकरी करत असल्याची माहिती मिळाल्याने अधिकृत विद्यार्थी आणि अनधिकृतपणे राहणाऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आठवडाभरात सुटण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. “आज महत्त्वाची बैठक आहे. पालकमंत्रीच झेंडा फडकवतील,” असे त्यांचे म्हणणे आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग बंद होत असल्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या माहितीनुसार शहरात मोठे प्रकल्प येत असून उद्योगांची संख्या वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्याबाबत प्रश्न संवादातून सुटतात, त्यामुळे ही भेट झाली असावी, असेही शिरसाट म्हणाले.
याशिवाय आपल्या नावाचा वापर करून पैसे मागणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. “माझ्या नावावर पैसे मागत असतील तर पोलिसात गुन्हा दाखल करा,” असे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, या सर्व वक्तव्यांमध्ये “लवकरच मोठ्या घडामोडी दिसतील” हा शिरसाटांचा इशारा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांबाबत काही मोठा राजकीय निर्णय होणार का, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.