नेपाळच्या महापुराचा बिहारला ‘फिश अलर्ट’! सरकारचा मोठा इशारा; अनोळखी मासे खाल्ल्यास उलटी-दस्तापासून श्वास घेण्यास त्रासाचा धोका

पाटणा : बिहारमध्ये पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. सध्या पुराच्या पाण्यात पकडलेले किंवा अनोळखी मासे खाऊ नका, असं आवाहन बिहार सरकारच्या डेअरी, मत्स्य आणि पशू संसाधन विभागाने केलं आहे. या सूचनेमागे नेपाळमधील जलप्रलयाचाही संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.
नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह बिहारच्या दिशेने आला आहे. या पाण्यासोबत काही अज्ञात आणि असामान्य प्रकारचे मासे बिहारमधील नद्या आणि इतर जलस्रोतांमध्ये पोहोचल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशा माशांचं सेवन केल्यानंतर काही लोक आजारी पडल्याच्या घटना समोर आल्याने प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.

पूरस्थितीत तलाव, नद्या, सरोवरे आणि जलाशयांमधील मासे पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या अंतरापर्यंत वाहून जातात. यादरम्यान त्यांचा दूषित नाले, मृत जनावरे, सांडपाणी आणि इतर घाणीशी संपर्क येऊ शकतो. परिणामी या माशांमध्ये जीवाणू, विषाणू किंवा इतर हानिकारक घटक असण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा माशांचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.


स्वस्त मिळत असले तरी मासे खरेदी करू नका!
विभागाने नागरिकांना केवळ मासे खाण्यापासून सावध केलं नाही, तर पुराच्या पाण्यात पकडलेल्या माशांची बाजारात विक्री करू नये, असे निर्देशही दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी माशांची खरेदी करू नये. ते स्वस्त दरात मिळत असले तरी केवळ कमी किमतीच्या मोहापायी त्यांचं सेवन करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत आणि पुराच्या पाण्यातील दूषित घटक व आजार पसरवणाऱ्या कारणांचा नैसर्गिकरित्या निचरा होईपर्यंत पुराच्या पाण्यात पकडलेले मासे खाणं टाळावं, असं मत्स्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
उलटी, जुलाब, पोटदुखी झाली तर तातडीने रुग्णालयात जा
चुकून अशा माशांचं सेवन झाल्यानंतर उलटी, जुलाब, पोटदुखी, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं जाणवली, तर नागरिकांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुराच्या पाण्यात किंवा परिसरात अनोळखी मासे आढळल्यास नागरिकांनी जिल्हा मत्स्य अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं, असं विभागाने स्पष्ट केलं आहे.