पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मिरवणुकांमध्ये ‘या’ गोष्टीला मनाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात गणेश मिरवणुकांमधील डीजे, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि लेझर लाईटचा वापर चर्चेचा विषय ठरला आहे. गणेश मिरवणुकांमध्ये डीजे तसेच मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिमला परवानगी देऊ नये, अशी मागणी विद्यानंद बापट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला काही नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

१४ ते २५ सप्टेंबरपर्यंत निर्बंध
गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, लेझर लाईटमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असून, मिरवणुकांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.


नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर निर्बंध लागू केले आहेत.
नियम मोडल्यास कडक कारवाई
या कालावधीत गणेश मंडळे, संस्था किंवा इतर संबंधितांनी मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गणेश मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्ती, संस्था किंवा गणेश मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करत साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.