NEET पुनर्परीक्षेची तारीख अखेर जाहीर! या दिवशी होणार पुन्हा परीक्षा, विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता…

मुंबई : एनटीएकडून ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली NEET २०२६ परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. पेपर फुटीमुळे ही नीट परीक्षा रद्द कऱण्यात आली होती. आता नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ जून रोजी नीटची परीक्षा होणार आहे. काल केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा – पदवी २०२६ च्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी संपूर्ण भारतात पुन्हा घेतली जाणार आहे. नीट पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.
३ मे रोजी झालेल्या या परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला होता. नीट यूजी पुनर्परीक्षेसंदर्भात गुरुवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या आयोजनाशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, सुरक्षा व्यवस्था आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण व शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच NTA, CBSE आणि इतर संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असली तरी, कमी वेळात पुन्हा तयारी करावी लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष २१ जून रोजी होणाऱ्या नव्या परीक्षेकडे लागले आहे.