पुणे जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादीची फील्डिंग; आमदारांची जोरदार….

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षशक्ती वाढवण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी खास मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवसापूर्वीच मावळ तालुक्यात भाजपला शिंगावर घेत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवायचा, असा एल्गार पुकारला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचेच जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा रणशिंग फुंकले असून सर्वांनी पक्षशक्ती वाढवण्यासाठी कामाला लागा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार का आहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार बोलून दाखवण्याबरोबरच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले आहेत. ‘स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करू नका, सर्वांनी पक्षशक्ती वाढवण्यासाठी कामाला लागा. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे,’ असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

