पार्थ पवार यांनी पहिला शिलेदार पाठविला विधिमंडळात; पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विक्रम काकडे अखेर बिनविरोध …


पुणे : पुणे विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय पडद्यामागील सर्व हालचालींना यश मिळाले असून महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांचा विधानभवनातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विरोधकांसह बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याने काकडे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले. या विजयाकडे केवळ एका उमेदवाराचा विजय म्हणून नव्हे, तर पार्थ पवार यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची पहिली मोठी झलक म्हणून पाहिले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी होता. महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही बंडखोर उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र अंतिम टप्प्यात समीकरणे वेगाने बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी पक्षाच्या आदेशानुसार माघार घेतली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही आपला अर्ज मागे घेतला होता. भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनीही माघार घेतल्याने विक्रम काकडे यांच्यासमोरील सर्व अडथळे दूर झाले.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यात पार्थ पवार यांची राजकीय सक्रियता वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क, संघटनबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यामुळे त्यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा होती. आता विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, पुण्यातील ही बिनविरोध निवड महायुतीसाठी प्रतिष्ठेचा विषय होती. ती यशस्वी करून दाखवत महायुतीने आपली ताकद दाखवून दिली आहे. दुसरीकडे विरोधकांना उमेदवार टिकवून ठेवण्यात अपयश आल्याने त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची औपचारिक घोषणा बाकी असली तरी पुण्यातील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘पार्थ पवारांचा पहिला शिलेदार विधानभवनात’ ही चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!