विधानपरिषदेआधीच महायुतीचा ‘स्ट्राईक रेट’ जबरदस्त! 17 पैकी 8 जागा बिनविरोधच्या मार्गावर; मविआला सलग धक्के

पुणे : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीने मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोर, अपक्ष आणि विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने तब्बल 17 पैकी 8 जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने अर्धी लढाई जिंकल्याची चर्चा रंगली असून महाविकास आघाडीला मात्र एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 रिक्त जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र मतदानापूर्वीच अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुकीचा रंग अधिकच गडद झाला आहे. पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांनी पडद्यामागे मोठ्या हालचाली केल्या. त्याचा परिणाम अर्ज माघारीच्या प्रक्रियेत स्पष्टपणे दिसून आला.
कोकणमध्ये ठाकरे गटाचे बाळ माने, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, ठाण्यात अभिजीत पवार, अहिल्यानगरमध्ये करण ससाणे, यवतमाळमध्ये सय्यद फारूक, तर सोलापुरात धनंजय डिकोळे आणि महेश साठे यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतली. काही ठिकाणी बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यात पक्षांना यश आले, तर काहींनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत स्पर्धेतून माघार घेतली.

या घडामोडींमुळे पुण्यात महायुतीचे विक्रम काकडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अनिकेत तटकरे, तसेच यवतमाळ आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील महायुती समर्थित उमेदवारांचा मार्ग सुकर झाला आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

दुसरीकडे सोलापूर, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये अद्याप चुरशीच्या लढती होणार आहेत. सोलापुरात राजेंद्र राऊत यांच्यासमोर नागेश अक्कलकोटे आणि जीवन जानकर यांचे आव्हान कायम आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीत अतुल लोंढे विरुद्ध डॉ. राजीव पोतदार अशी प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे.
अर्ज माघारीनंतरचे बदललेले चित्र पाहता, मतदानाआधीच महायुतीने राजकीय आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. आता उर्वरित मतदारसंघांतील प्रचाराची धार आणि स्थानिक समीकरणेच अंतिम निकालाचे चित्र ठरवणार आहेत.