मंचरमध्ये राष्ट्रवादीची मोठी आघाडी, बंडखोर देवदत्त निकम पिछाडीवर..
मंचर : पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक डिंभे मतदार संघातून सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्व १५ उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली होती. मात्र, पहिल्या फेरीत निकम यांना पडलेली मते पाहता ते मोठ्या पिछाडीवर पडलेले दिसत आहेत. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
देवदत्त निकम यांनी बंडखोरी केल्याने याठिकाणी कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उमेदवारी नाकारल्याने निकम यांनी थेट राष्ट्रवादीला म्हणजे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आव्हान दिल्याचे मानले जात होते. मात्र, त्यात ते पहिल्याच फेरीत पिछाडीवर पडले आहेत.
महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम अशी येथे तिरंगी लढत होत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सरासरी ५७ ते ६३ मतदान झाले आहे. देवदत्त निकम यांना २१ मते मिळाली आहेत. ग्रामपंचायत गटात महाविकास आघाडीला सरासरी १५० मते मिळाली आहेत.