Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून १०९ वाणांचे लोकांपर्यंत, शेतकऱ्यांना होणार फायदा…
Narendra Modi : अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैवसंवर्धनयुक्त अशा १०९ वाणांचे लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत हा कार्यक्रम झाला.
यावेळी पंतप्रधानांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवादही साधला आहे. भरडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तंतुमय पिके तसेच उत्तम उत्पादन देणाऱ्या इतर पिकांचा लोकार्पित वाणांमध्ये समावेश आहे.
बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाज्या, लागवडीची पिके, कंद वर्गातील पिके, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतीही समाविष्ट आहेत. शाश्वत शेती आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पीक पद्धतींचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. Narendra Modi
भारताला कुपोषणमुक्त करायचे, तर जैवसंवर्धनयुक्त प्रजातींना सरकारच्या माध्यान्ह भोजन, अंगणवाडी यासारख्या उपक्रमांशी जोडले पाहिजे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला. या वाणांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले होतील.
दरम्यान, उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी आहारातील बाजरी पिकाच्या महत्त्वावर आवर्जून चर्चा केली. वाणांच्या संशोधनाबद्दल पंतप्रधानांनी कृषी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.