पुणे- मुंबई प्रवास करणारांसाठी आनंदाची बातमी, आजपासून सिंहगड एक्स्प्रेसचे डबे वाढणार

पुणे : मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यावरुन प्रवासांची भांडणंदेखील झाली. या भांडणाचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती.
त्यामुळे प्रवाशांनी कोच वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता 1 मे पासून मध्य रेल्वेने मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला सेकंड क्लास चेअर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचा हा नवा कोच (Sinhgad Express Non AC Coach) नॉन एसी कोच असणार आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसला 16 कोच असणार आहे. या ट्रेनची बुकिंग करण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई- पुणे धावणारी सिंहगड एक्सप्रेस 12 ऑक्टोबरला सकाळी चिंचवड स्टेशनवर येताच रेल्वेच्या बोगीत प्रवासी घुसले अन् जागा पकडण्यासाठी झुंबड उडाली होती. पासधारक प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांच्यामध्ये जागा पकडण्यावरुन वाद सुरु झाला होता.