मुंबई महापालिकेला पुन्हा बॉम्बची धमकी; ‘जलसा’ बंगला, मेट्रो स्टेशनचाही मेलमध्ये उल्लेख..


मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालयासह महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स आणि मेट्रो स्थानकांवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी १०.१२ वाजता महापालिकेला मेल
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. या मेलमध्ये महापालिकेचे मुख्यालय आणि महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुंबईतील काही मेट्रो स्थानकांनाही लक्ष्य करण्याचा दावा करण्यात आला आहे.

गेल्या चार महिन्यांत अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल पाच वेळा आल्याची माहिती आहे. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस आणि महापालिका प्रशासनासमोर सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे.

यापूर्वीही ‘जलसा’ बंगल्याला धमकी
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला यापूर्वीही ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. एका प्रसंगी बिग बी चाहत्यांना भेटण्यासाठी बंगल्याबाहेर आले असताना सुरक्षेच्या कारणास्तव बुलेटप्रूफ काचेचा वापर करण्यात आला होता.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यापूर्वी अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याशी संबंधित धमकी आणि हल्ल्यांच्या घटनाही चर्चेत आल्या होत्या. तसेच गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमालाही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, नव्या धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांकडून तपास आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे. धमकीतील दावे खरे आहेत की केवळ अफवा, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!