दौंड रेल्वे स्थानकाचा उपनगरीय रेल्वे स्थानकाचा दर्जा फेटाळल्याने खासदार सुप्रिया सुळे आक्रमक, रेल्वेमंत्र्यांकडे केली मोठी मागणी..


दौंड : गेल्या काही दिवसांपासून दौंड स्थानकाबाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी आहेत. याठिकाणी पुणे दौंड ‘डेमू’चा प्रवास देखील मोठा जिकीरीचा झाला आहे. यावर शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सतत आवाज उठवला आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक पोस्ट करत याबाबत मोठी मागणी केली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, पुणे दौंड दरम्यान हजारो प्रवासी नियमित प्रवास करतात. पण या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ‘डेमू’चा प्रवास अनेकदा रेंगाळतो. त्यामुळे प्रवाशांना पुण्यातील आपले कामाचे ठिकाण गाठण्यास बराच उशीर होतो. या गोष्टी अलिकडच्या काळात सतत होत आहेत.

त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमावाव्या लागल्याची उदाहरणे आहेत. हा प्रवास प्रवाशांसाठी अधिक सोयीचा व वक्तशीर व्हावा यासाठी दौंड स्थानकाला उपनगरीय रेल्वे स्थानकाचा दर्जा द्यावा ही येथील प्रवाशांची मागणी आहे. परंतु ही मागणी रेल्वे बोर्डाने कोणतेही सबळ कारण न देता फेटाळून लावली आहे. सध्या दौंड स्थानक हे सोलापूर ‘डीआरएम’च्या कार्यक्षेत्रात आहे.

ते पुणे ‘डीआरएम’च्या कार्यक्षेत्रात जोडले तर याचा फायदा प्रवाशांना होईल. याखेरीज दौंड स्थानकाला उपनगरीय रेल्वे स्थानकाचा दर्जा देण्यासाठी त्याची मदतही होईल. हे लक्षात घेता माझी रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे ‘डीआरएम’च्या कार्यक्षेत्रात करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्या.

यासह दौंड स्थानकाला उपनगरीय रेल्वे स्थानकाचा दर्जा देऊन दोन्ही स्थानकांदरम्यान लोकलसेवा सुरू करावी. ही नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी असून त्यांच्या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकाचा दर्जा देण्यासाठीचा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यासंबंधीच्या सूचना संबंधितांना द्याव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!