स्वारगेट बस बलात्कार प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे संतापल्या! म्हणाल्या, पोलिसांची गस्त, जवळच पोलीस स्टेशन अन्…

पुणे : आज पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याबाबत आता खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट केली आहे.

त्या म्हणाल्या, अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस ठाणे आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात.
तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते, ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी आमची मागणी आहे.

अशी पोस्ट त्यांनी केली आहे. याबाबत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीच्या मागावर आठ पथके तैनात करण्यात आली असून घटनेने सगळेच हादरले असून पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही तरुणी फलटणला जाताना ही घटना घडली आहे.