मावळमध्ये खळबळ! पोलीस भरतीसाठी मुंबईहून आली, प्रशिक्षकाचा फोन अन् थेट घरात नेलं; १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीने गंभीर प्रकरण उघड

मावळ : पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मुंबईहून मावळमध्ये आलेल्या १९ वर्षीय तरुणीने केलेल्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. प्रशिक्षण संस्थेचा चालक आणि प्रशिक्षक असलेल्या व्यक्तीने फोन करून तरुणीला आपल्या घरी नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मुंबई येथून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी वडगाव मावळ येथे आली होती. ती शौर्य करिअर अकॅडमी, केशव नगर, वडगाव येथे प्रशिक्षण घेत होती. या संस्थेचा चालक व प्रशिक्षक राजु लक्ष्मण माडगी (वय ३१, रा. चतुर्भुज रेसिडेन्सी, फ्लॅट नं. २०१, विशाल लॉन्स, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

रात्री फोन केला अन् घरी नेले


फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.०३ वाजल्यापासून २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४० वाजेपर्यंत आरोपीने तरुणीला फोन करून आपल्या राहत्या घरी नेले. तेथे तिची इच्छा नसतानाही जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
पीडित तरुणी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याने या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत संबंधित कलमाची वाढ करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करत आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.