पुणे जिल्ह्यात २८.६६ लाख मतदारांची नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा

पुणे : भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतून विविध कारणांमुळे तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
पुनरीक्षण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. त्यापैकी ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांनी गणना पत्रक भरून दिले. मात्र, पडताळणीदरम्यान मोठ्या संख्येने मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नाहीत.

कोणत्या कारणामुळे किती नावे वगळली?
प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये १७ लाख ८३ हजार ५८ मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून आले नाहीत. तसेच ५ लाख ९१ हजार ३८ मतदारांचे स्थलांतर झाल्याचे निदर्शनास आले आहे.


याशिवाय ३ लाख १२ हजार ४८ मतदार मृत, तर १ लाख ४३ हजार ९७५ नावे दुबार असल्याचे आढळले. इतर कारणांमुळे ३६ हजार ३६२ नावे वगळण्यात आली आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावा-हरकत दाखल करता येणार
प्रारूप मतदार यादीतून नाव वगळण्यात आले असल्यास संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करून नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करता येणार आहे. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
सन २००२ च्या मतदार यादीत स्वतःचे किंवा आई-वडील, आजी-आजोबांचे नाव असल्याचा पुरावा असलेल्या मतदारांना नमुना क्रमांक ६ भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करायची असल्यास आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.
एखाद्या मतदाराच्या नावाबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ द्वारे हरकत नोंदवता येणार आहे.
‘अॅनॉमलीज’ आणि ‘नो लिंकेज’ प्रकरणांवर सुनावणी
प्रारूप मतदार यादीतील काही मतदारांच्या तपशीलात तफावत आढळली आहे. तसेच काही मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग झालेले नाही. अशा ‘अॅनॉमलीज’ आणि ‘नो लिंकेज’ प्रकरणांवर संबंधित यादीभागाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, ज्या मतदारांचे नाव प्रारूप यादीतून वगळले गेले आहे किंवा तपशिलात त्रुटी आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबरपर्यंत दावा किंवा हरकत दाखल करावी.
४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी
दावे आणि हरकतींवर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या स्तरावर सुनावणी होणार आहे. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरदरम्यान या प्रकरणांवर निर्णय घेतला जाणार आहे.
त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे अपील करता येणार आहे.
मतदार यादी कुठे पाहता येणार?
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर तसेच भारत निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.