मनसेचा मास्टरप्लॅन ; मनपा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचें कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश..

पुणे : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. या निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन आखत त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.निवडणुका लक्षात घेता त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करा, अशी सूचना दिली आहे. विधानसभेत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हानगरचा दौरा करत आहे. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी,,जे गेले ते आपले नाहीत असे राज ठाकरे म्हणाले. याद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पक्षात एकीची भावना निर्माण झाली आहे. यामुळे कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तसेच राज ठाकरेंनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. अनेकांचा असा विश्वास आहे की निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात मतचोरी होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. यापुढे हे प्रकार रोखण्यासाठी आपण मतदार याद्यांवर काम केले पाहिजे.कार्यकर्त्याला आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा, त्यात असलेल्या त्रुटी दूर करा. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची नोंद घ्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यापूर्वी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो होते, ज्यावर “महाराष्ट्रात फक्त ठाकरेच…” असे लिहिले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीआधी युती होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

