आमदारांनो साधे राहा, आणि…!!! नरेंद्र मोदी यांनी महायुतीतील आमदारांना दिला कानमंत्र, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबईत महायुतीच्या सर्व आमदारांसोबत चर्चा केली. आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकास विषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. तसेच त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको. साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली. पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
तसेच बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, या शब्दात त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना बदल्यांच्या अनेक फायली यायच्या, मी ते बंद केले होते. जनसेवा कशी करायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. संघकार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देश मी पंतप्रधान होण्याआधी पाहून झालेला होता. मला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. तुम्हीही फिरले पाहिजे, खेड्यात मुक्कामी राहिले पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे, अशा अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी आमदारांनी त्यांच्यासोबत भोजन करून संवाद साधला.