शिंदे गटाच्या आमदाराला पत्रकाराची ‘ती’ बातमी झोंबली! शिवीगाळ करत केली मारहाण…
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
तसेच ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आज गुरुवारी (ता.१०) सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.
दरम्यान मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणाले होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही.
आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला व माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील. असे त्यांनी म्हंटले आहे.