‘या’ आरोपींवर थेट ‘मकोका’ लागणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे.
वारंवार गोहत्येच्या गुन्ह्यात सापडणाऱ्या आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत आमदार संग्राम जगताप यांनी गोहत्या आणि तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गायींची तस्करी ही छुप्या पद्धतीने होत असून, यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत. या तस्करीत वारंवार सामील होणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल.
महाराष्ट्रात २०१५ पासून गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार गाय, बैल आणि वळू यांच्या कत्तलीवर बंदी आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर ₹१०,००० दंड आणि ५ वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली जाते. आता या शिक्षेबरोबरच मकोका अंतर्गत कारवाईची घोषणा झाल्याने अधिक कठोर पावलं उचलली जातील.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार गायींच्या तस्करीविरोधात सतत गुप्त माहिती आणि स्थानिक यंत्रणांमार्फत नजर ठेवत आहे. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.