लोणी काळभोर येथील मटका जुगार चालकाची एक वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी…

लोणी काळभोर : बेकायदेशीर मटका जुगार चालविणारा रेकॉर्डवरील सराईत, महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, बुटलेगर, ड्रग ऑफेंडर आणि धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मटका जुगार चालविणाऱ्यावर एमपीडीए कायदा दुरुस्तीनंतर पुणे शहर आयुक्तालयातील ही पहिलीच कारवाई आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.

तात्याराव महादेव ससाणे (वय ५० रा. माळी मळा, मारुती मंदिराशेजारी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससाणे हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार चालवत होता. पोलिसांनी अनेकदा त्याच्यावर कारवाई केली होती. परंतु, तो पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता सातत्याने बेकायदेशीर मटका जुगार चालवित होता.

सार्वजनिक सुव्यवस्था भंग करीत होता. त्याचे या कृत्यामुळे गोर गरीब लोकांचे आर्थिक नुकसान होऊन संसार उध्दवस्त होत होते. त्यामुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
तात्याराव ससाणे याला कायद्याचा धाक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई व्हावी म्हणून प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पोलिस अपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. अमितेश कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.
