मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; रात्री उशिरा उपचार सुरू, वैद्यकीय पथकाची 24 तास नजर


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील सातत्याने जोरदार टीका करत आहेत. मराठा समाजाचे वाटोळे केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना त्यांनी एकेरी भाषेचा वापर केला आहे.

दरम्यान, शिंदे गटातील मंत्र्यांकडूनही जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. ही टीका सहन केली जाणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी जरांगे यांच्याबाबत एकेरी भाषेचा वापर सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, सरकारने जरांगे यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे सांगत आता सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्या चर्चेसाठी जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही आदेशही जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे, जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामधील चर्चेत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जरांगे आणि सरकारकडून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

आंतरवाली सराटीतून काल जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मुंबईत धडक देण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा आंदोलकांसह मुंबईत जाणार असल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, उपोषणाचा चौदावा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून, रात्री उशिरापासून त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर 24 तास लक्ष ठेवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी परवा रात्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. गेल्या चार दिवसांपासून सरकारच्या शिष्टमंडळाकडूनही कोणतीही चर्चा झालेली नाही.

दरम्यान, उद्या 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून, आता उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!