ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी मोठी बातमी! NCMC कार्ड नसलं तरी मिळणार एसटीची सवलत; प्रवासासाठी ‘ही’ गोष्ट आवश्यक


पुणे : राज्यातील एसटी बसमधून सवलतीत प्रवास करायचा असेल, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या विविध बस आगारांमध्ये NCMC कार्ड काढण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

मात्र, NCMC कार्ड काढताना प्रवाशांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्ड मिळण्यास होणारा विलंब, कार्ड सक्रिय करणे, त्यामध्ये पैसे भरणे आणि शिल्लक रक्कम तपासणे यांसारख्या समस्यांमुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. अशा प्रवाशांना दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

NCMC कार्ड तुमच्याकडे नसले तरी तुम्हाला एसटी बसमधून सवलतीत प्रवास करता येणार आहे. मात्र, यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे, तुम्ही NCMC कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्याची पावती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

NCMC कार्ड नसले तरी सवलत कशी मिळणार?

परिवहन मंत्र्यांनी एसटी बसमधून प्रवास करताना भाडेसवलत मिळवण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 सप्टेंबरपासून NCMC कार्ड काढणे बंधनकारक केले होते. ज्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडे NCMC कार्ड नसेल, त्यांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट घ्यावे लागणार होते.

त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी बस आगारांमध्ये NCMC कार्ड काढण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या. आतापर्यंत अनेक प्रवाशांना कार्ड मिळाले आहे; मात्र काही प्रवासी अद्याप कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

अशा प्रवाशांनी काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही NCMC कार्डसाठी अर्ज केला असेल आणि त्याची पावती तुमच्याकडे असेल, तर ती पावती वाहकाला दाखवून तुम्ही सवलतीत प्रवास करू शकता. त्यामुळे कार्ड अद्याप मिळाले नसले तरी अर्जाची पावती असल्यास ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

प्रवाशांच्या मदतीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

NCMC कार्डच्या वापरादरम्यान येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्ड सुरू करणे, त्यामध्ये शिल्लक रक्कम भरणे, शिल्लक तपासणे तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत या हेल्पलाइनद्वारे प्रवाशांना मदत मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांसाठी एसटी बस प्रवासादरम्यान NCMC कार्ड अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या काळात कार्ड सक्रिय करणे, पैसे भरणे आणि शिल्लक रक्कम तपासणे यासंदर्भात प्रवाशांना अडचणी येत असल्याचे समोर आले होते.

अधिकृत प्रतिनिधींची नियुक्ती

प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी ईबिक्स टेक्नॉलॉजिस लिमिटेडमार्फत एसटी डेपो, बसस्थानके आणि परिसरात NCMC कार्डच्या नोंदणी व वितरणासाठी अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.

यामुळे NCMC कार्ड काढणे, त्याचा वापर करणे आणि तांत्रिक अडचणी सोडवणे याबाबत प्रवाशांना आवश्यक मदत मिळणार आहे. त्यामुळे कार्ड वापराबाबतच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या अनेक अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!