महसूल विभागाचा मोठा निर्णय! रोज ३ ते ५ वाजता अधिकारी नागरिकांसाठी उपलब्ध; थेट मांडता येणार तक्रारी…


पुणे : महसूल विभागाशी संबंधित कामे, तक्रारी किंवा अडचणी घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांना आता तासनतास प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महसूल विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी महसूल अधिकाऱ्यांनी दररोज दोन तासांचा वेळ राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी आणि तक्रार निवारणासाठी राखीव असणार आहे.

या कालावधीत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, तक्रारी तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रश्न जाणून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे विविध कामांसाठी नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.

विशेष म्हणजे, दुपारी ३ ते ५ या नागरिक भेटीच्या वेळेत कोणतीही बैठक किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आयोजित करू नये, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी राखीव असलेल्या या वेळेत अधिकारी उपलब्ध राहणे सुनिश्चित होणार आहे.

तसेच, दुपारी ३ ते ५ ही नागरिक भेटीची वेळ असल्याची माहिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठळकपणे प्रदर्शित करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित तक्रार, अडचण किंवा काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना आता दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महसूल प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!