शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तुमचं नाव आहे का?


पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज्यभरातील तब्बल 3 लाख 55 हजार 614 पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, ही यादी जिल्हानिहाय तसेच बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही ही यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी यादीमध्ये आपले नाव तपासून पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

पहिल्या यादीतील 12 लाख 58 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

योजनेच्या पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 12 लाख 58 हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर तब्बल 10 हजार 114 कोटी 90 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यामध्ये 7 ऑगस्ट 2026 रोजी 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 28 कोटी 60 लाख रुपये, तर 24 ऑगस्ट 2026 रोजी 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी 30 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी काय करावे?

दुसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासावी. त्यानंतर नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेली, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांकडून एकूण 31 लाख 17 हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या 16 लाख 96 हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र, शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

मृत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंद न होणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही नियम

योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील विभागनिहाय पात्र लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर विभाग – 1 लाख 95 हजार 899
अमरावती विभाग – 71 हजार 796
नागपूर विभाग – 34 हजार 520
नाशिक विभाग – 25 हजार 471
पुणे विभाग – 23 हजार 117
कोकण विभाग – 4 हजार 811

त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी संबंधित यादीमध्ये आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!