मला राज्यपाल करा! सदाभाऊ खोत यांच्या मागणीने सगळेच आश्चर्यचकित, राजकारणात नेमकं घडतंय काय?

सांगली : शेतकरी नेते आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या एका मिश्किल वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात खोत यांनी ‘मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ असं म्हटलं आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
खोत यांनी ज्या पद्धतीने ‘राज्यपाल तरी करा’ असे वक्तव्य केले आहे, त्यावरून अनेक राजकीय विश्लेषकांनी विविध तर्क लावले. काहींचं मत आहे की, खोत यांना सत्तेत योग्य स्थान मिळालं नाही, म्हणून त्यांनी ही टिप्पणी केली. तर काहींचं म्हणणं आहे की, हे फक्त त्यांची भाषाशैली आणि विनोदी अंदाज आहे.
खोत हे पडळकरांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं, बाबा, तुम्ही आमदार व्हा. डॉक्टर, तुम्ही खासदार व्हा. पडळकरसाहेब, तुम्ही मंत्री व्हा.. आणि मला कुठं तरी राज्यपाल तरी करा! नाहीतर आमची अवस्था बँडवाल्यासारखी होईल! हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. पण यामागे राजकीय नाराजी आहे का? अशी चर्चा लगेचच सुरू झाली.
दरम्यान, मात्र या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आल्याने, सदाभाऊ खोत यांनी लगेच स्पष्टीकरण देत ही संपूर्ण गोष्ट मिश्किल असल्याचं सांगितलं. “मी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहे. माझ्या भाषेचा बाज गावगड्याचा आहे. माझी भाषा शैली रानडी असली तरी ती मनापासूनची असते. सभेला आलेले शेतमजूर, बारा बलुतेदार हसावेत, यासाठी मी अशा शैलीत बोलतो, असं ते म्हणाले.
तसेच, त्यांनी स्पष्ट केलं की, माझ्या मनात कुठलीही खदखद नाही. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे. माझ्या वक्तव्याचं अर्थ प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनानुसार घेतो असे ते म्हणाले आहे.