सरकारकडून पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल! ९६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुण्यासह राज्यभरात नव्या नियुक्त्या, कुणावर कोणती जबाबदारी? सविस्तर यादी समोर

मुंबई : राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने शुक्रवारी तब्बल ९६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये भारतीय पोलिस सेवेतील (IPS) ५२ तर राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस प्रशासनातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कृष्ण प्रकाश यांची अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मनोज शर्मा यांची मुंबई पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदावर बदली करण्यात आली आहे. सुवेझ हक यांच्याकडे मुंबई पोलिस सहआयुक्त (प्रशासन) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महेश पाटील यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून परमजीत दहिया यांची दहशतवादविरोधी पथकात महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सी. के. मीना यांच्याकडे कोकण परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर संजय दराडे यांची पुणे पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे, ठाणे आणि नवी मुंबई पोलिस दलातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रंजन शर्मा यांची गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) येथे नियुक्ती करण्यात आली असून सुनौल फुलारी यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
राजेश प्रधान यांची प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. निशिथ मिश्रा यांची फोर्स वनमध्ये नियुक्ती करण्यात आली असून जय कुमार यांच्याकडे व्हीआयपी सुरक्षा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय येनपुरे यांची ठाणे अपर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून दीपक साकोरे यांची पदोन्नतीवर नवी मुंबई पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. योगेश गुप्ता यांची गडचिरोली पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राकेश ओला यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती करण्यात आली असून नंदकुमार ठाकूर यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्यांनाही या बदल्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रियांका नारनवरे यांची मुंबई पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून तेजस्वी सातपुते यांच्याकडे पुणे शहरातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोक्षदा पाटील यांची मुंबईत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्योती प्रिया सिंह यांची वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, या बदल्यांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली, जालना आणि कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून काहींना नव्या जबाबदाऱ्या देत राज्यातील पोलिस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत.