बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चाहूल! १६ नोव्हेंबरला मोठं संकट घोंघावणार? अनेक राज्यांना पावसाचा इशारा; महाराष्ट्राबाबत काय सांगतो हवामान विभाग?


नवी दिल्ली : देशातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याच्या तयारीत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता तीव्र स्वरूप धारण केले असून, पुढील ४८ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होऊ शकते. या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतासह काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी आणि दाट धुक्याची शक्यता असून महाराष्ट्रासाठी मात्र वेगळीच अपडेट समोर आली आहे.

१६ नोव्हेंबरला चक्रीवादळाची शक्यता; कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार

हवामान विभागाच्या १४ नोव्हेंबरच्या अधिकृत निवेदनानुसार, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पुढील २४ तासांत अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या ठळक क्षेत्रात आणि त्यानंतर द्रोणिकेत होण्याची शक्यता आहे. पुढे ही प्रणाली उत्तर-वायव्य दिशेने सरकत १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते.

या बदलामुळे अंदमान-निकोबार बेटांवर १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

कुठे पाऊस, कुठे वादळी वारे?

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १४ व १५ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर परिसरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून झोत ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात.

ओडिशामध्ये १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १९ आणि २० नोव्हेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि काही भागांतही पावसाची शक्यता कायम आहे.

समुद्र खवळणार; मच्छीमारांना महत्त्वाचा इशारा

चक्रीवादळाच्या संभाव्य हालचालीमुळे बंगालच्या उपसागरातील समुद्र खवळण्याची शक्यता आहे. अंदमान समुद्र आणि बेटांच्या परिसरात १६ नोव्हेंबरपर्यंत, तर दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात १७ नोव्हेंबरपर्यंत खराब हवामान राहू शकते. त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत किनाऱ्यावर परतावे. तसेच संबंधित समुद्री क्षेत्रांत पुढील काही दिवस मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात पाऊस पडणार की थंडी वाढणार?

देशातील काही भागांत पावसाचा अंदाज असताना महाराष्ट्रासाठी मात्र सध्या मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. हवामान विभागाच्या अधिकृत निवेदनानुसार पश्चिम आणि मध्य भारतात आठवडाभरात लक्षणीय हवामान बदल अपेक्षित नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागांत रात्री आणि पहाटे थंडी जाणवू शकते, तर दिवसा उन्हाचा चटकाही कायम राहू शकतो.

एकीकडे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, तर दुसरीकडे उत्तर भारतात पाऊस आणि धुक्याचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस देशातील हवामानावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!