‘अजितदादांबद्दल प्रचंड सहानुभूती, पण पक्षातलेच दोन-तीन जण काड्या करतात!’ मनोज जरांगेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नवं वळण

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानाने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती असल्याचे सांगतानाच, त्यांच्या पक्षातीलच दोन-तीन जण काड्या करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेत नेमका अडथळा कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजितदादांबद्दल सहानुभूती, पण पक्षातील नेत्यांवर नाराजी?


राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, अजितदादांबद्दल आपल्याला प्रचंड सहानुभूती आहे. मात्र, त्यांच्याच पक्षातील दोन-तीन जण काड्या करतात. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आणि प्रमाणपत्र मिळवण्याचा लढा हाच आपला मुख्य विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी यावर वेगवेगळी विधाने केली आहेत. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे या विषयावर संभ्रम कायम असतानाच जरांगे यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

हैदराबाद गॅझेटवरून सरकारला घेरले
राजकीय विलीनीकरणाच्या चर्चेबरोबरच जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सातारा आणि औंध गॅझेट लागू होऊ नये, यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
सरकारच्या कारभारावर टीका करताना त्यांनी माणुसकी आणि नीतिमत्ता सोडलेले सरकार आजपर्यंत पाहिले नसल्याचे म्हटले. सत्तेसाठी ईडी आणि चौकशी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून शिंदे गटालाही सवाल
५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराशी संबंधित ऑडिओ क्लिपवरूनही जरांगे यांनी भूमिका मांडली. समाजाने आपल्याला वेड्यात काढू नये म्हणून सरकारला वेळ देत असल्याचे ते म्हणाले. या कथित व्यवहाराच्या मुद्द्यावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सवाल उपस्थित केले.
येडशीतील सहा मृत्यूंवर हळहळ; जबाबदारांवर कारवाईची मागणी
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेवर जरांगे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत कुटुंबातील एकमेव उरलेल्या कृष्णाला आई-वडील, भाऊ आणि बहिणीचे छत्र पुन्हा मिळणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या घटनेवरून अग्निशमन विभागाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सुरू असलेला राजकीय पेच, दुसरीकडे मराठा आरक्षण आणि कथित ५०० कोटींच्या व्यवहाराचा मुद्दा, तर तिसरीकडे येडशी दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी, अशा विविध विषयांवर जरांगे यांनी भाष्य केले. त्यांच्या आरोपांवर सरकार आणि संबंधित नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
