दौंडमध्ये पोलिसांची धडक कारवाई! भीमनगर आणि गिरीममध्ये तंबाखू विक्रीचा पर्दाफाश, दुकानदारांवर गुन्हे दाखल..

दौंड : दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी दौंड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत कारवाईला सुरुवात केली आहे.
दौंड पोलिसांकडून ही मोहीम सातत्याने सुरू असून, आता शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. भीमनगर परिसरात पोलिसांनी COTPA कायद्यान्वये तपासणी केली असता शाळेच्या प्रवेशद्वारापासून १०० यार्डच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या एका पानटपरीसह तीन किराणा दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळले.


या प्रकरणी सुनील पोपट सोनवणे (वय ५२), रेबीना विल्सन पिंटो (वय ४०) आणि अमोल बापूराव सोनवणे (वय ४०, सर्व रा. भीमनगर, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, दौंड तालुक्यातील गिरीम येथील पोतदार शाळेसमोरील चेअरमन टी सेंटर या पानटपरीवरही पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सिगारेटची विविध पाकिटे, गायछाप व पंढरपुरी तंबाखू तसेच बिडीची पाकिटे असा एकूण २ हजार ५३७ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, पानटपरी चालक बबन नारायण तांबे (वय ५२, रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्धही COTPA कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी (दि. १३) एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दौंड पोलिसांनी दिला आहे.
