पैशांच्या हिशेबावरून नात्याचं रक्तरंजित वळण! साडूनेच साडूचा जीव घेतला, दुसऱ्या दिवशी आरोपीही मृतावस्थेत; दोन सख्ख्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त


सांगली : पैशांचा हिशेब चुकला आणि दोन कुटुंबांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं! मिरज तालुक्यातील बेळंकी येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन साडूंमध्ये वाद झाला. या वादातून बबलू भगवती याने आपल्याच साडू महेशकुमार ब्रिजलाल गौतम यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या मारहाणीत महेशकुमार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर बबलू साथीदारांसह पसार झाला; मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचाही मृतदेह जवळच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही मृतांच्या पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळे एकाच घटनेत दोन बहिणींच्या संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कामाचे पैसे ठरले वादाचे कारण

महेशकुमार गौतम, बबलू भगवती, दिनेश मोहन आणि मुलचंद बल्ली गौतम हे चौघेही परप्रांतीय कामगार कामानिमित्त बेळंकी येथे आले होते. काम संपल्यानंतर गावी परतण्यापूर्वी त्यांच्यात पैशांचा हिशेब सुरू होता. याच व्यवहारावरून महेशकुमार आणि बबलू यांच्यात वादाची ठिणगी पडली. सुरुवातीची बाचाबाची वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. बबलू आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांनी महेशकुमार यांना बेदम मारहाण केली. यावेळी लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात महेशकुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा शोध सुरू असतानाच दुसरी धक्कादायक घटना

हत्येनंतर बबलू आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अजित कोकाटे यांनी संशयितांच्या शोधासाठी रात्रीच विविध पथके रवाना केली. मात्र शनिवारी सकाळी जवळच्या शेतात बबलू भगवती याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक पाहणीत त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दोन सख्ख्या बहिणींच्या आयुष्यात मोठं संकट

या घटनेने परिसरातील नागरिकही सुन्न झाले आहेत. महेशकुमार आणि बबलू हे नात्याने साडू होते आणि त्यांच्या पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळे एका बहिणीच्या पतीची हत्या झाली, तर दुसऱ्या बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन्ही बहिणींवर वैधव्याची वेळ आली.

पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलूचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. या प्रकरणात महेशकुमार यांच्या हत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून बबलूच्या मृत्यूबाबत स्वतंत्र कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पैशांच्या हिशेबावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट दोन मृत्यूंमध्ये झाल्याने बेळंकीसह संपूर्ण मिरज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!