2029 ला बारामतीत मोठा राजकीय ट्विस्ट? जय पवारांच्या एका वक्तव्याने सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना जोर

बारामती : बारामतीच्या राजकारणात 2029 च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच रंगू लागली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या ताज्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार विधानसभा निवडणूक लढवू शकतातच, पण भविष्यात मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव पुढे येऊ शकतं, असे संकेत जय पवार यांनी दिल्याने महायुतीतील भावी नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत बारामतीत आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. या विजयानंतर त्या केवळ पवार कुटुंबातील सदस्य म्हणून नव्हे, तर स्वतंत्र नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सुरू झाली. बारामतीतील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण असल्याचं चित्र दिसत आहे.
एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी स्वतःच्या राजकीय भविष्यासंदर्भातही भूमिका स्पष्ट केली. “माझं नाव लोकसभेसाठी चर्चेत असलं तरी मी सर्वांसाठी इथेच काम करणार आहे,” असं सांगत त्यांनी खासदारकीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, याचवेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेचं मुख्य कारण ठरत आहे.

“दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची अनेकांची इच्छा होती. आता वहिनीही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये त्या बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव पुढे यावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे,” असं जय पवार म्हणाले.

या विधानामुळे महायुतीतील भविष्यातील नेतृत्वाच्या चर्चांना नव्याने उधाण आलं आहे. सध्या राज्यात भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा कायम असते. अशातच राष्ट्रवादीच्या गटातून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत असल्याने आगामी काळातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे 2029 मध्ये सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यास ती निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची लढत ठरू शकते, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.