हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात, तपासात आणखी धक्कादायक खुलास्यांची शक्यता…


पुणे : हडपसर बॉम्ब प्रकरणाच्या तपासात पुणे दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात नागपूर रेल्वे स्थानकावरून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी संपूर्ण राज्यात सतर्कता वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. हडपसरमधील बॉम्ब प्रकरणाच्या तपासादरम्यान या व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली. सध्या संशयिताला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी हडपसर परिसरातील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक पोलीस आणि एटीएसने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला.

तपासादरम्यान काही महत्त्वाचे तांत्रिक धागेदोरे हाती लागल्यानंतर एटीएसने संशयिताचा माग काढत नागपूरपर्यंत शोधमोहीम राबवली. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, तपास यंत्रणा अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी करत असून संशयिताचे इतर कोणाशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये एटीएसने हालचाली वाढवल्याची माहिती समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!