बस चारशे फूट खोल दरीत, शेतकऱ्याच्या एका फोनने वाचला अनेक प्रवाशांचा जीव…

नाशिक : काल नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एस टी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.
बसमध्ये 22 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. असे असताना ही घटना काशिनाथ गायकवाड या शेतकऱ्यांने बघितली. त्यांनी तात्काळ नांदुरी चौकीत तत्पर सेवा बजावणारे वाहतूक पोलीस योगेश गवळी यांना घटनेची माहिती दिली.
गवळी यांची सध्या नाशिक येथे बदली झालेली आहे. कर्तव्यात कसूर न करता योगेश गवळी यांनी सप्तश्रुंग गड आणि नांदुरी येथे सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करून तात्काळ मदतकार्य उभे केले. या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
यामुळे अनेकांचे जीव वाचले. दरम्यान, अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८:३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती.
त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. सप्तशृंगी गडावरून खाली येत असतांना घाटात गणपती टप्प्यावरुन थेट दरीत कोसळली त्यामुळे बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट ४०० फूट दरीत कोसळली आहे.