महेश कोठारेंच्या आई जेनमा यांचं निधन, सहा महिन्यांपूर्वी वडिलांनाही घेतला जगाचा निरोप..

मुंबई : निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या आई सरोज कोठारे अर्थात जेनमा यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. कोठारे कुटुंबियांकडून त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दरम्यान, याच वर्षी जानेवारी महिन्यातच महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले होते.

याबाबत आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा). संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं आदिनाथने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या जाण्याने कोठारे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
आदिनाथ याच्या पोस्टनंतर चाहते कमेंट्स सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींकडूनही इन्स्टाग्रामवरून शोक व्यक्त केला जात आहे. २१ जानेवारी २०२३ रोजी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते.
