MPSC आंदोलनाला पुणे पोलिसांचा दणका! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली; जागा रिकामी करण्याचे आदेश..

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या MPSC आंदोलनाबाबत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले धरणे आंदोलन तातडीने गुंडाळून जागा रिकामी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. सुरक्षेचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आयुक्तालयाचे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनामुळे मध्य पुण्यातील वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. तसेच आंदोलनादरम्यान ‘पुणे बंद पाडू’ अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आल्याचा आक्षेपही पोलिसांच्या नोटीसमध्ये घेण्यात आला आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर मागण्या मान्य झाल्याचा दावा करत आंदोलन मागे घेण्यात आल्याचं पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे यापूर्वीची आंदोलनाची परवानगी रद्द झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान रस्ते आणि पूल अडवून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचा संदर्भही पोलिसांनी दिला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत पोलीस उपायुक्तांनी एस. एम. जोशी पुलावरील धरणे आंदोलनाची फेरपरवानगी नाकारली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आंदोलनाचा लोकशाही अधिकार कायम राहणार असल्याचं सांगत प्रशासनाने पर्यायी जागेचा प्रस्तावही दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रीतसर अर्ज केल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पोलिसांच्या या आदेशानंतर विद्यार्थी आंदोलक पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
