गृहकर्जाचा मोठा बोजा होणार हलका; या सोप्या ट्रिक्सने लोन लवकर फेडा, व्याजाचे लाखो रुपये वाचवा…

मुंबई : प्रत्येकालाच स्वतःचं हक्काचं घर असावं, असं वाटतं. मात्र घर खरेदीसाठी मोठी रक्कम लागते. त्यामुळे अनेकजण बँकेकडून २० ते २५ वर्षांसाठी होम लोन घेतात आणि दर महिन्याला ईएमआय भरत कर्जाची परतफेड करतात. मात्र दीर्घकाळ कर्ज फेडत राहण्याऐवजी काही नियोजन केल्यास हे कर्ज मुदतीआधीच फेडता येऊ शकतं.
यासाठी एक सोपं सूत्र वापरता येतं. उदाहरणार्थ, तुम्ही ३० लाख रुपयांचं कर्ज २० वर्षांच्या मुदतीसाठी घेतलं आणि त्यावर १० टक्के व्याजदर गृहीत धरला, तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे २६,०३५ रुपये होतो.

हे कर्ज २० वर्षांपूर्वी फेडायचं असेल तर दरवर्षी नियमित ईएमआयसोबत एक अतिरिक्त ईएमआय भरता येईल. त्यानंतर उत्पन्न वाढत गेल्यास प्रीपेमेंटची रक्कमही हळूहळू वाढवता येते.


उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी एक अतिरिक्त ईएमआय भरल्यानंतर पुढील वर्षी त्यापेक्षा अधिक रक्कम कर्जाच्या मुद्दलात जमा करता येईल. त्याचप्रमाणे दरवर्षी अतिरिक्त रक्कम वाढवत नेल्यास कर्जाची मुदत मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
यासोबतच पगारात वाढ झाल्यास ईएमआयची रक्कम वाढवणे हा देखील एक पर्याय आहे. वर्षभरात मिळणारा बोनस, टॅक्स रिफंड किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न थेट कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीसाठी वापरल्यास व्याजाचा बोजाही कमी होतो.
मात्र अतिरिक्त रक्कम कर्जात भरताना तुमच्या होम लोनच्या प्रीपेमेंटच्या अटी आणि शुल्क आधी तपासणे महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन, नियमित अतिरिक्त भरपाई आणि उत्पन्न वाढीनुसार ईएमआयमध्ये वाढ केल्यास दीर्घ मुदतीचं होम लोन मुदतीआधी फेडण्यास मदत होऊ शकते.
