रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला, मग चंद्रकांत पाटलांना सूट का? अशोक खरातच्या फोटोवरून धंगेकरांचा थेट सवाल; बावनकुळेंनी मैदानात उतरत दिलं प्रत्युत्तर!


मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडाली आहे. या छायाचित्राचा आधार घेत शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, रुपाली चाकणकर यांच्याबाबतीत एक भूमिका आणि चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत दुसरा निकष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धंगेकरांच्या या मागणीला भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिल्याने वाद आणखी चर्चेत आला आहे.

अशोक खरातवर अनेक महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा मिळाले, जेव्हा खरातसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे विविध कार्यक्रमांतील छायाचित्रे समोर आली. खरातसाठी छत्री धरल्याच्या मुद्द्यावरूनही चाकणकर यांच्यावर टीका झाली. वाढत्या वादानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

आता रविंद्र धंगेकर यांनी समाजमाध्यमांवर चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे. या छायाचित्रात पाटील खरातच्या पाया पडताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून धंगेकरांनी सरकारला अडचणीत आणणारा प्रश्न उपस्थित केला. खरातसोबतच्या संबंधांवरून रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई झाली, मग खरातच्या पाया पडणाऱ्या चंद्रकांतदादांच्या बाबतीत वेगळा न्याय का, असा सवाल त्यांनी केला.

धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणात समान निकष लागू करण्याची मागणी केली आहे. निर्णय घेताना संबंधित व्यक्ती कोणत्या पक्षाची किंवा किती मोठ्या पदावर आहे, हे पाहू नये. चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावण्यात आला, तोच चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीतही लागू झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. खरातने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी वेगळे काही केले होते का, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, धंगेकरांच्या आरोपांनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांची बाजू मांडली. धंगेकर दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावर राजकीय टीका करतात, असे सांगत त्यांनी या टीकेला फारसे महत्त्व देऊ नये, अशी भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील यांनी आपले आयुष्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी समर्पित केले आहे. त्यांचे जीवन संस्कारमय आहे. त्यांच्या कार्याचा आणि आयुष्याचा अभ्यास केला, तर धंगेकर अशी टीका करणार नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

त्यामुळे आता या छायाचित्रावरून सुरू झालेला राजकीय वाद थांबण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धंगेकरांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार आणि भाजपकडून यावर पुढे काय प्रतिक्रिया येणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!