मध्यरात्रीच्या त्या एका धडकेने दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर! गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाची कार, दोन चुलत भावांचा जागीच अंत; मद्यप्राशनाचा संशय, आरोपीला अटक

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवण्याच्या कथित प्रकाराने कोल्हापुरात दोन तरुणांचा जीव घेतला आहे. शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोलनाका मार्गावर मध्यरात्री कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत उमेश पाथरूट (वय ३२) आणि गणेश पाथरूट (वय ३४) या सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. या अपघातातील कारचालक पद्मसिंह रणजितसिंह पाटील हा गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा आहे. राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली असून, वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक अहवालात नमूद असल्याची माहिती आहे.
२२ नोव्हेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता हा अपघात झाला. सायबर चौक परिसरातील पाथरूट गल्लीत राहणारे उमेश विलास पाथरूट आणि गणेश सुनील पाथरूट हे दोघे जेवणासाठी शिवाजी विद्यापीठ परिसरात गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून घराकडे परतत होते. त्याचवेळी ताराबाई पार्क परिसरात राहणारा पद्मसिंह पाटील विनफास्ट कंपनीची विद्युत कार घेऊन शाहू टोलनाक्याच्या दिशेने जात होता. कारचा वेग प्रचंड असल्याचे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान कारची दुचाकीला जोरदार धडक बसली.

धडकेचा जोर इतका भीषण होता की उमेश आणि गणेश हे दोघेही सुमारे १५ फूट दूर हवेत फेकले गेले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन कमावत्या व्यक्ती गेल्या; कुटुंबांवर संकट
उमेश आणि गणेश हे दगडी मूर्ती तयार करण्याचे पारंपरिक काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कष्टाने त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला होता. मात्र, एका अपघाताने दोन्ही कुटुंबांचा आधार हिरावला. दोघांच्याही मागे लहान मुले आणि वृद्ध आई-वडील आहेत. घरातील कमावत्या व्यक्तींच्या अचानक जाण्याने पाथरूट कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक
या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात पद्मसिंह पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात त्याने मद्यप्राशन केल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
