महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच दोन्ही पवार करतील!! शरद पवारांच्या भेटीनंतर दादांच्या आमदाराचे मोठं वक्तव्य, पुन्हा एकत्र येणार?

पुणे : सध्या राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे दोन्ही पक्षातले बडे नेते हे एकमेकांच्या संपर्कात असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पार्थ पवार पोहचले होते. तेव्हापासून याबाबतची चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे.
आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे वक्तव्य अनेक अर्थाने वेगळे आहे.

तुपे म्हणाले, सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे, ते दोन्ही पवार करतील असे चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का, ही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे शरद पवार यांची भेट नेमकं कशासाठी होती, याची चर्चा सुरू झाली आहे.

चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. साहेब आमच्या सर्वांचेच आहेत. साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखे आहेत. कायम राजकारण हा विषय नसतो साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत, असेही तुपे म्हणाले.
तसेच प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांच्या नेतृत्वाखाली मी असेल शिकलो आहे. असेही ते म्हणाले. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार का? हे लवकरच समोर येईल.