Maharashtra Politics : ‘एमआयएम’सोबत मविआची युती होणार? महत्वाची माहिती आली समोर…

Maharashtra Politics : एमआयएमने उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम ही विघातक शक्ती आहे. महाविकास आघाडीसोबत एमआयएमची एकही बैठक झाली नसल्याचे म्हटलं आहे.
दानवेंना प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्यासोबत जे नेते चर्चेला बसले होते, त्यांनी सांगितले आमचे छोटे नेते आहेत त्यांना चर्चेबद्दल सांगू नका. मी कुणासोबत चर्चेला बसलोय हे मला माहिती आहे.
कुणासोबत चर्चा झाली हे मला सांगण्याची गरज नाही. परंतु ते नेते अंबादास दानवेंपेक्षा मोठे आहेत हे नक्की, आपली चर्चा कुणालाही सांगू नका, प्राथमिक चर्चा झाल्यावर पुढे बोलू अशी संबंधित नेत्यांनी चर्चेवेळी अट घातली होती. मुंबईत ही बैठक झाली. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माहिती घ्यावी, मी मुंबईला गेलो होतो, कुठल्या हॉटेलला थांबलो होतो. मला कोण कोण भेटायला आले होते हे जाणून घ्यावे असा टोला त्यांना लगावला. जलील माध्यमांच्या मुलाखतीत हे बोलले. Maharashtra Politics
तसेच उद्धव ठाकरे विधानसभेला मुस्लिम उमेदवार देणार ही आनंदाची बाब आहे. लोकसभेत त्यांनी एकही उमेदवार दिला नाही. लोकांनी नरेंद्र मोदींविरोधात भाजपाविरोधात जाऊन त्यांना मतदान केले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसलाही ते कळले आहे.
तशी परिस्थिती विधानसभेला होणार नाही. त्यामुळे मुस्लिमांची मते घ्यायची असतील तर मुस्लिम उमेदवार द्यावे लागतील हे त्यांना कळाले आहे. फक्त उमेदवारी देऊ नका तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या. चांगला उमेदवार द्या, असे आव्हान जलील यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
त्याशिवाय एमआयएमसोबत युती नाही असे अंबादास दानवे बोलतात, परंतु शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांना अधिकार दिलेले आहेत का? तुमचे नेते उद्धव ठाकरे आहेत त्यांना बोलू द्या. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे, एमआयएमसोबत युती नको, ते किरकोळ आहेत, त्यांची ताकद नाही. मग आमची ताकद आम्ही दाखवू. मुस्लिम मते सगळ्यांना हवीत. शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे, अजित पवार सगळ्यांना मते हवीत. एमआयएमकडून मी महाविकास आघाडीला ऑफर मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
त्यावेळी आम्हाला लेखी प्रस्ताव हवा असे काही नेते म्हणाले, त्यांनीही माध्यमांमधून हे सांगितले असते तर मी लेखी प्रस्तावही पाठवायला तयार आहे. हो किंवा नाही असे थेट सांगा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका.
महाविकास आघाडीचे ३ मोठे नेते आहेत त्यांनी बोलावं, उद्धव ठाकरेंनी सांगावे, अंबादास दानवेंनी जे सांगितले तसे आम्ही एमआयएमला घेणार नाही. तिथे विषय संपतो, शरद पवारांनी सांगावे, आम्हाला एमआयएम चालत नाही, असेही जलील यांनी म्हटले आहे.