Maharashtra Kesari 2023 : कुस्त्यांचा थरार रंगणार! ‘महाराष्ट्र केसरी’ची तारीख ठरली, बक्षीस म्हणून मिळणार थार गाडी अन्…

Maharashtra Kesari 2023 : राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
यंदा पुण्यात ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Maharashtra Kesari 2023
या विजेत्याला महिंद्रा थार जीप, उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीगीराला ट्रॅक्टर आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक व स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. Maharashtra Kesari 2023
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ या कुस्तीस्पर्धेत सहभागी होणार आहेत. माती तसेच गादी गटात कुस्ती खेळवली जाईल.
या स्पर्धेत सुमारे ८४० कुस्तीगीर सहभागी होतील, असेही सांगण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल.
एका कुस्ती संघात गादी विभागातील १० आणि माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक अशा एकूण २३ जणांचा सहभाग असेल. साधारण या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक, ८० पंच आणि ५० पदाधिकारी, अशा एकूण ११०० जणांचा सहभाग असेल, अशी माहिती प्रदीप कंद यांनी दिली.
दरम्यान, कुस्तीगिर संघटनेच्या वादामुळे यावर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. धाराशिवला आणि पुण्याजवळील फुलगावमध्ये अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी कुस्ती स्पर्धा पार पडतील. कुस्तीपटू दोन्ही ठिकाणी खेळू शकणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.