Maharashtra Election Result 2024 : अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारणार? शरद पवार गटात परतण्याच्या चर्चा, सुप्रियाताईंकडे संपर्कही झाला?

Maharashtra Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. २०२४ च्या लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. तर, निवडणूक निकालांत महायुतीचा पुरता धुव्वा उडाला आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभेत भोपळा फुटला असला तरी केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटानं पुन्हा एकदा कंबर कसली असून आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे.
पण, अजित पवारांच्या या बैठकीला काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आले आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

महायुतीला राज्यात बसलेला जोरदार धक्का पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ७ आणि ८ तारखेला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. Maharashtra Election Result 2024
महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि महाविकास आघाडीनं बाजी मारली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.