मनमानी कारभाराविरोधात महाबँक कर्मचाऱ्यांचे लोकमंगल समोर आंदोलन…


पुणे : ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी महाबॅंकेचे मुख्यालय ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्‍यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

प्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, संघटन सचिव शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.याच मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे देशभरातील कर्मचारी २० मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत.

हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ साली सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतनदेखील दिले जात नाही. कायमस्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल, सुट्टया कांहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत.

बँकेत ७०० पेक्षा अधिक शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही. १२९० शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली, तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे.

कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत. याचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढते आहे, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की, बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी, जेणेकरून समाधानकारक ग्राहकसेवा देता येऊ शकेल.

दरम्यान, याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत. त्यातूनच फ्रॉडस होण्याची शक्यता निर्माण होते, नव्हे होत आहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? बॅंक यावर संवेदनशील नाही म्हणूनच २० मार्चला महाबँकेत संप अटळ बनला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!