“प्रेम, पैशांचा मोह अन् थरारक कट” ; मुंब्र्यात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

मुंब्रा : “तो बेपत्ता झाला… पण काही दिवसांनी उघड झालेलं सत्य ऐकून पोलिसही हादरले!” मुंबईलगतच्या मुंब्रा परिसरातून समोर आलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून सुरू झालेला वाद अखेर रक्तरंजित शेवटापर्यंत पोहोचला. धक्कादायक म्हणजे, एका महिलेनं स्वतःच्या नवऱ्या आणि भावाच्या मदतीने तिच्याच बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

मुंब्रा परिसरात राहणारा अरबाज मकसून अली खान हा ३ ऑगस्ट २०२६ रोजी घरातून कामासाठी बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. दिवस उलटत गेले, पण अरबाजचा काहीच मागमूस लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासताना पोलिसांना अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सोवा भागात मिळाले. विशेष म्हणजे, त्याच परिसरात अरबाजची गर्लफ्रेंड मेहजबीन शेख हिचे लोकेशनही आढळले. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मेहजबीनची चौकशी सुरू केली.

सुरुवातीला मेहजबीनने पोलिसांना वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशीचा फास आवळताच अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, मेहजबीन, तिचा पती हसन आणि भाऊ तारीक शेख यांनी मिळून अरबाजकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता. यासाठी अरबाजला वर्सोवा येथे बोलावण्यात आले.

घटनादिवशी आरोपींनी अरबाजला पैशांसाठी दबाव टाकला. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याचे हात-पाय बांधण्यात आले. त्यानंतर प्लास्टिकच्या पाइपने त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह हिरव्या रंगाच्या मोठ्या ड्रममध्ये भरला आणि मुंब्रा परिसरातील निर्जन नाल्यात फेकून दिला. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी मेहजबीन शेख आणि तारीक शेख यांना अटक केली असून, आरोपी हसन आणि त्याचा साथीदार मुजम्मल पठाण हे फरार आहेत. पोलिसांची विशेष पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
या संपूर्ण घटनेमुळे मुंब्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “प्रेम, पैशांचा मोह आणि विश्वासघात” यांचा हा भयानक शेवट असल्याची चर्चा सुरू आहे.